पुणे/नागपूर : श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, तर प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचं विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आलं. त्यावरून पेपर फुटल्याचं लक्षात येताच परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत आपला निषेध नोंदवलाय.
नागपूरमध्येही फुटला पेपर : पीएचडी फेलोशिप ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या परीक्षेचे संपूर्ण पेपर पहिलेच फुटला असल्याचं निदर्शनास आलं. तसंच, विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या असा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केलाय. पेपर फुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयावर मैदानात पटांगणामध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पडसाद : नागपूर आणि पुण्यात पेपर फुटीची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्येही उमटलेत. देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केलीय. प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय.
विद्यार्थ्यांना बंद करुन ठेवल्याचा आरोप : परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंद करुन ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. या परीक्षेत गोंधळ होण्याची ही दुसरी वेळ आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा ही या पूर्वी २४ डिसेंबरला घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर बहिष्कार : यावेळी २०१९ ची जुनीच प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आज पुन्हा या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या परीक्षेत मुलांना प्रश्नपत्रिका झेरॉक्स दिल्यानं हा पेपर फुटल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर बहिष्कार घालत परीक्षा दिली नाही. यावेळी त्यांनी सरकार विरोधी घोषणा बाजी देखील केली. बार्टी, सारथी, महाज्योति प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या.
हेही वाचा :
1 काय सांगता! तलाठी भरती परीक्षेत एकाला 200 पैकी चक्क 214 गुण; युवक कॉंग्रेसनं केला 'हा' मोठा आरोप
2 जिथं घडवले क्रिकेटचे 'रत्न', 'त्या' मैदानावर जपल्या जाणार प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या आठवणी
3 112 वर्ष जुन्या हिंदी साहित्य समितीवर लिलावाची टांगती तलवार; ग्रंथालयात आहेत दुर्मीळ हस्तलिखितं