पुणे - देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात असते. पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी शहरातील सराफ असोसिएशने १५ जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखांची आर्थिक मदत केली.
पुणे सीआरपीएफचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) बिरेंद्र कुमार टोप्पो यांच्या हस्ते ही मदत हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
“सीआरपीएफच्या या १५ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आज असोसिएशनने जी आर्थिक मदत देऊ केली आहे. ती मदत ही केवळ त्या वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना नाही तर सीआरपीएफमध्ये काम करणा-या सर्व जवानांच्या कुटुंबीयांना केली आहे", असे आम्ही मानतो, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "या मदतीमुळे आम्हा सर्व जवानांच्या मनात एक आंतरिक समाधानाची भावना निर्माण झाली आहे. युद्ध सीमेवरील असो अथवा देशाच्या आंतरिक भागातील त्याची सर्वांत मोठी किंमत ही जवानांच्या कुटुंबीयांना द्यावी लागते. त्यामुळे आम्ही लढत असताना हुतात्मा झालो तर आमच्या मागे आमच्या कुटुंबीयांना मदत करायला आपल्या देशातील नागरिक नक्की उभे राहतील, हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही करीत असलेल्या बलिदानाची किंमत नागरिकांना आहे, याचे आम्हाला समाधान आहे.
या १५ वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना केली मदत
पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा रोहितदास लांबा, गुरु एच, नारायण लाल गुर्जर, हेमराज मीना, रमेश यादव, संजय राजपूत, कौशल कुमार रावत, प्रदीप सिंग, श्याम बाबू, अजित कुमार आझाद, नितीन राठोड, भगीरथी सिंग, जयमल सिंग, पंकज कुमार त्रिपाठी, कुलविंदर सिंग या महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश व कर्नाटकातील जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करीत त्यांना १ लाखांचे धनादेश सुपूर्त करण्यात आले.