देहू (पुणे) - संत तुकाराम महाराज यांचा ३३५ वा पालखी सोहळा आज (शुक्रवारी) पार पडत आहे. अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले.
देहूनगरीत महाराष्ट्रासह इतर ठिकाणाहून वारकऱ्यांनी येऊ नये, असे आवाहन विश्वास्तांकडून करण्यात आले होते. त्याला वारकरी संप्रदायाने प्रतिसाद दिला आहे. देहूनगरी दरवर्षी 'ग्यानबा तुकारामा'च्या गजराने दुमदुमून जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित पालखी प्रस्थान सोहळा पार पडला आहे. मुख्य मंदिराच्या येथून पालखीचे दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रस्थान ठेवले. दरम्यान, संपूर्ण देहूनगरीत आज (शुक्रवारी) शांतता पहावयास मिळाली.
दरम्यान, पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिरात विसावणार आहे. यानंतर ३० जूनला आषाढी एकादशीच्या दिवशी हेलिकॉप्टर किंवा बसने पंढरपूरला रवाना होणार आहे. यावेळी मोजक्या विश्वस्त, सदस्य आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीतही मंदिर परिसर हा 'ग्यानबा तुकारामा'च्या गजराने दुमदुमून गेला होता.