बारामती : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने पालखी रथ व दिंड्यांचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
स्वागतासाठी चौकाचौकात मंडप उभारले : बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले गेले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी नगरपरिषेदेकडून सुविधा : आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई - सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बारामती नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. निर्मल वारी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे.
शहरात वृक्षारोपण केले : स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत 'निर्मळ वारी हरित वारी' च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.
चित्ररथातून शासनाच्या योजनांविषयी जनजागृती : या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, वन विभाग, बारामती नगर परिषद इत्यादी विभागांच्या चित्ररथातून शासनाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात येत असून या चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा :
- Ashadhi wari 2023 : ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन; माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान
- Ashadhi wari 2023: सात वेळा केला रायगड सर, 80 वर्षीय आजी वारीत सहभागी, जाणून घ्या त्यांचा अनुभव
- Ashadhi wari 2023: वारीसारखा जगात कुठेही आनंद नाही... 21 दिवसांची सुट्टी घेऊन दोन बहिणी सोहळ्यात दंग