पुणे - टाळ आणि विठ्ठल नामाच्या गजरात संत तुकाराम महाराज्यांच्या पालखीचे बारामती नगरीत आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे बारामतीकरांकडून जंगी स्वागत करण्यात आले. वारीचे आगमन होत असल्याने मंगळवारी सकाळपासूनच बारामती शहरात ठिकठिकाणी अभंग, भारुड, कीर्तनाचे कार्यक्रम चालू होते. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले होते.
नागरिकांनी वारकर्यांचे भक्तिभावाने स्वागत केले. संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत बारामती नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी केले. यावेळी कीर्तन भारुडाच्या भक्तीमय वातावरणात बारामती नगरी न्हाहून निघाली. पढंरपूरकडे निघालेल्या या पालखीसोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. शहरातील शारदा प्रागंण येथे पालखीचा मुक्काम होता.
नगरपालिकेच्यावतीने पालखीदरम्यान चोवीसतास पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभाग अशी पथके सज्ज करण्यात आली. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, केर कचरा तसेच बंद पडलेली वाहने वाहतूक विभागाकडून उचलण्यात आली होती. पालखी सोहळ्या दरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी पालिकेच्या वतीने घेण्यात आली. पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणची पूर्ण स्वछता करण्यात आली. वारकऱ्यांसाठी निवारा, पाणी, स्वछतागृहांची जागो जागी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मेंढ्याचे रिंगण होणार आहे.