पुणे - पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा काल (गुरुवार) पुण्यात मुक्काम होता. पुणे मुक्कामानंतर या दोन्ही पालख्यांनी शुक्रवारी पहाटे पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान केले. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिरातून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरातून सकाळची काकड आरती केल्यानंतर मार्गस्थ झाली. यावेळी पालखीला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेसुद्धा नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत एकत्र जातात, हडपसरनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटाकडे रवाना होते तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याकडे रवाना होते. देहू आणि आळंदीहून निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुण्यात एकत्र येत असतात. पुण्यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरीकडे मार्गक्रमण करत असतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा शुक्रवारी रात्री लोणी काळभोर इथल्या विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार आहे. तर माऊलींची पालखी दिवे घाटाचा अवघड पल्ला पार करून सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे.