पुणे (आळंदी) - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला राज्य सरकारकडून २० लोकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे 20 लोकांबरोबर पालखी मार्गाने माऊलींच्या पादुका एसटी बसने पंढपुरला 30 जुनला मार्गस्थ होणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी दिली आहे.
कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पायी सोहळा रद्द करण्यात आला होता. माऊलींच्या पादुकांचे समाधी मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर मंदिराच्या बाजुलाच असणाऱ्या देऊळ वाड्यात पादुका ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी आषाढी सोहळ्याप्रमाणे सर्व विधी परंपरेनुसार करून भजन, किर्तन, आरती असे सर्व कार्यक्रम करण्यात येत होते.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका एसटी बसने 20 लोकांच्या उपस्थित पालखी मार्गाने न थांबता प्रस्थान होणार आहेत. मात्र, ज्या 20 लोकांचा या पालखी सोहळ्यात सहभाग होणार आहे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, त्यानंतरच त्यांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखी मार्गाने 30 जुनला सकाळी पंढरपुरकडे मार्गस्थ होणार आहेत. विसबावी किंवा वाखरीपासून पंढरपूर असा पालखीचा पायी प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. आषाढी सोहळा संपन्न झाल्यानंतर दशमीला माऊलींच्या पादुका आळंदीकडे पायी येत असतात. मात्र, कोरोनामुळे माऊलींच्या पादुका दशमीपर्यत पंढरीतच ठेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचे आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.