आळंदी (पुणे) sanjivan samadhi sohala : ज्ञानेश्वर महाराजांच्या 727 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी माऊलींचा जयघोष करत श्रींची वैभवशाली रथोत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. संजीवन उत्सवानिमित्त 'श्री'चं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी नगरप्रदक्षिणा मार्गावर गर्दी केली होती. माऊलींच्या संजीवन समाधीचा मुख्य कार्यक्रम सोमवारी (उद्या) होणार आहे.
जयघोषात रथोत्सव मिरवणूक : तत्पूर्वी पहाटे माऊलींना अभिषेक करून अडीच वाजता प्रांताधिकारी कट्यारे यांच्या हस्ते दूधआरती करण्यात आली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास परंपरेनुसार इनामदार परिवाराच्यावतीनं माऊलींचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर माऊलींचा चांदीचा मुखवटा सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आला. विविध रंगीबेरंगी, आकर्षक वस्त्रांनी सजलेलं 'श्री'चं रूप भाविकांचं लक्ष वेधून घेत होतं. टाळ-मृदंगांच्या गजरात, माऊली-तुकोबाच्या जयघोषात रथोत्सव मिरवणूक मारुतीपासून फुलवळे धर्मशाळा, चाकण चौक, भैरेबा चौक मार्गे मुख्य मंदिराकडं निघाली. प्रदक्षिणा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी माऊलीचा यावेळी जयघोष केला.
संजीवन सोहळ्याची जय्यत तयारी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा सोमवारी होणार आहे. पहाटे तीन वाजता संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सुरू होईल. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला अलंकापुरी येथे समाधी घेतली होती. त्याला मंगळवारी ७२७ वर्षे पूर्ण होतील. यावेळी श्रींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. माऊलींच्या मंदिरात घंटानाद होणार आहे, सोहळ्यावर आधारित वीणा मंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचं कीर्तन होणार आहे. या पार्श्वभूमीवर समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला माऊली मंदिराला फुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी माऊली समाधी घेण्यासाठी जात असतानाचं प्रतीकात्मक चित्र फुलांच्या माध्यमातून साकारण्यात आलं आहे.
हेही वाचा -