पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी पालखीचा नगरप्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या समाधीवर मर्यादित पुजाऱ्यांच्या उपस्थित सकाळी मंत्रोच्चारात पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. दुपारी एक वाजता नित्यनियमाप्रमाणे माऊलींच्या पालखीचा नगरप्रदक्षिणा सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पार पडला. यासाठी समाधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट केली होती.
मंदिर व परिसर भाविकांविना सुने-सुने -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात संचारबंदी लागू असल्याने इतिहासात प्रथमच भाविकांविना संजीवन समाधी सोहळा साजरा झाला. त्यामुळे मंदिर व परिसर भाविकांविना सुने-सुने होते. उपस्थित असलेल्या मोजक्या भाविकांनी माऊलींच्या नगरप्रदक्षिणेवेळी टाळ-मृदूंगाच्या तालावर हरिनामाचा गजर केला.
आज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता -
आज (कार्तिक वद्य त्रयोदशी) माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होत आहे. पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी परवानगी दिलेल्या श्री पांडूरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह शुक्रवारी आळंदीत दाखल झाल्या आहेत.
आळंदीत संचारबंदी लागू -
अलंकापुरीमध्ये आठ तारखेपासून संजीवन समाधी सोहळा सुरू झाला. मात्र, हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. संपूर्ण आळंदी शहर व परिसरात 6 डिसेंबरपासूनच संचारबंदी लागू केलेली आहे.