पुणे - एकीकडे कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तर दुसरीकडे मात्र शासनाकडून आलेला निधी हडप करण्याचा उद्देश ठेवून कोविड केअर सेंटरसाठी नवीन जागा शोधल्या जात असल्याचा आरोप भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला. कोरोना रुग्णांना वार्यावर सोडून फक्त शासनाचा निधी खर्च झाला हे दाखवण्यात प्रशासन आणि राज्यकर्ते मग्न आहेत, असाही त्यांनी आरोप केला.
शिरूर तालुक्यात रुग्ण वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी तात्काळ ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा बेड न मिळाल्यास कोविड रुग्णांना तहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या दारात नेऊन ठेवणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना बेड्स मिळत नाही. तसेच ऑक्सिजन मिळत नसल्याने मृत्यू होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आजपासून कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश नगरपरिषद व आरोग्य विभागास दिले असल्याचे म्हणाले.