पुणे - राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र कदापीही माफ करणार नाही, अशा शब्दांत काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
कोरोनाचे संकट गंभीर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. अशा शब्दांत काकडे यांनी मुख्यमंत्र्यांचे गुणगान केले. त्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. अन्यथा काँग्रेस - राष्ट्रवादी -
शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी व्यक्त केलेले मत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
महाराष्ट्राबरोबरच देशात कोरोनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जीवितहानीसह आर्थिक नुकसान होत असताना विरोधी पक्षांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य केले पाहिजे. कारण हीच आपली खरी संस्कृती असल्याचे माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितलं