पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी परिसरात घरफोड्या करणाऱ्या महिलेला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. महागडा शालू, साड्या, एक टीव्ही, सोन्याचे दागिणे, असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज ३० वर्षीय महिलेकडून जप्त करण्यात आला असून या महिलेचा सीसीटीव्हीवरून शोध घेण्यात आला.
तक्रारदार प्रकाश नामदेव ढेरे हे त्यांच्या कुटुंबासह गावी गेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरी घरफोडी झाली. यात नवीन महागडा शालू, साड्या, ३२ इंच टीव्ही, सोन्याचे दागिणे, असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज ३० वर्षीय महिलेने दरवाजाची कडी तोडून घरफोडी केली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी महिलेचा पती मद्यपान करून बेदम मारहाण करत होता. त्यामुळे महिलेने पळून जाण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. महिलेला चार मुले असून त्यांचा शिक्षणाचा खर्च देखील महिलाच करत होती, तर पती काहीही काम करत नव्हता. त्यामुळे महिलेला हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.