पुणे - मराठा आरक्षणाचा निर्णयाला मिळालेली स्थगिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला. अन्यथा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून या परीक्षा होऊ देणार नसल्याचा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. यावर संभाजी ब्रिगेडने मात्र उलट भूमिका घेतली असून एमपीएससीची परीक्षा होणाऱ्या केंद्राला संभाजी ब्रिगेड संरक्षण देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
प्रवीण गायकवाड म्हणाले, सरकारला वेठीस धरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय वेठीस धरू शकतो. परंतु अनेक विद्यार्थी पाच वर्षांपासून सातत्याने अभ्यास करत आहेत. ग्रामीण भागातून पुण्या-मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी दोन लाखाहून अधिक खर्च लागतो. क्लासेसची फी भरावी लागते. दिवसाचे १६-१६ तास ते अभ्यास करतात. या विद्यार्थ्यांना सरकार परीक्षेअंती नोकरी देत असेल तर त्यांना विरोध का करायचा. सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे.
त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेला विरोध करणे योग्य नाही. त्या ठरलेल्या वेळेप्रमाणे व्हायलाच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे हे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. त्यामुळेच एमपीएससीची परीक्षा होणाऱ्या केंद्रांना आम्ही संरक्षण देणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - केंद्रीय आरोग्य पथकाकडुन पिंपरीच्या जम्बो कोविड सेंटरची पाहणी