पुणे - लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना शाळा व महाविद्यालयांची पूर्ण फी भरणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील 50% फी माफ करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदेनी केली आहे.
पुणे जिल्हा १००% रेड झोनमध्ये आहे. दररोज ८०० ते ९०० रुग्ण आढळत असल्यामुळे कोरोनाचे संकट अत्यंत गडद होत चालले आहे. कोरोना महामारीच्या संकटात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे 80 टक्के हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पूर्ण फी भरणे शक्य नाही. मात्र पुर्ण फीस भरल्याशिवाय शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत आहेत. तसेच, डिसेंबर पर्यंत शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता कमी आहे आणि जरी सुरु झाली तरी लहान मुले फिजिकल डिस्टंसिंग मिळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. ज्या विद्यार्थांनी फि भरली नाही, अशा मुलांना शाळेच्या व्हाट्सअप ग्रुपमधून सुद्धा काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची 50% माफ करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा - विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले, शिवसेनेचा योगी आदित्यनाथांवर निशाणा
दरम्यान, शाळा महाविद्यालयाकडून चीनच्या झूम अॅपवर ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत, मात्र 80 टक्के पालक हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते मुलांना इंटरनेट व इतर मोबाईल सेवा पुरवू शकत नाही. जिल्ह्यात बरेच विद्यार्थी ग्रामीण भागात अर्थात (भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर व इतर ) यासारख्या डोंगराळ भागात राहतात त्यामुळे तिथे नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याने त्यांचा ऑनलाईन वर्ग पूर्ण होत नाही. मात्र शाळांकडून त्यांच्याकडे पूर्ण फी भरण्याचा तगादा लावला जात आहे. सुरक्षित नसलेल्या अॅपवर विश्वास ठेवणे सध्या धोक्याचे आहे आणि सर्वसामान्य गरीब पालकांना ते परवडणारे नाही.त्यामुळे राज्य सरकारने सर्व शाळा व महाविद्यालयांना सूचना करावी की, प्रत्येक क्लासचा स्वतंत्र व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांना पुरवावा. मुलांना अडचण आली तरी ते वारंवार व्हिडिओ पाहू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील 50% फी माफ करावी अन्यथा शाळा व महाविद्यालयांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.