पुणे : सध्याच्या डिजिटल युगात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मोबाईलमध्येच गुंतलेले दिसतात. सोशल मीडियामुळे तर लहान मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर पाहायला मिळतोय. मात्र पुण्याच्या एका 14 वर्षीय मुलाने यापासून लांब राहत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केलंय.
तायक्वांदोमध्ये यश मिळवलं : पुण्यातील शिवणे भागात राहणाऱ्या साईराज नलावडे या मुलाने तायक्वांदोसारख्या अवघड खेळात मोठं यश मिळवलंय. त्याने तायक्वांदोमध्ये पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्रात सुवर्ण, तर राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवलंय. आता त्याने खेलो इंडिया स्पेर्धेसाठी तयारी सुरू केली असून लवकरच तो ऑलिम्पिकसाठी देखील तयारी सुरू करणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले : साईराज नलावडे याने नुकतेच लखनऊ येथे झालेल्या सहाव्या नॅशनल कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत अंडर 56 किलो वजनी गटांत रौप्यपदक मिळवले. तो या स्पर्धेत पाच राज्यांविरुद्ध सामने खेळला. स्पर्धेत त्याने शानदार खेळाचे प्रदर्शन केले, मात्र अंतिम सामन्यात त्याला हरियाणाच्या खेळाडूकडून अवघ्या दोन गुणांनी पराभव पत्काराव लागला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते : साईराजच्या या यशामागे त्याला मार्गदर्शन करणारे प्रवीण शिंदे आणि हर्षल शिंदे यांचे योगदान मोलाचे ठरले. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळाले होते. आता राष्ट्रीय स्पर्धेत आणखी एक पदक मिळवून त्याने कुटुंबाचे व राज्याचे नाव रोषण केलंय.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल जिंकायचंय : त्याच्या या यशाबाबत साईराजने ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली. 'लहानपणी मी टिव्हीवर कराटे बघायचो. तेव्हा मी माझ्या वडिलांना म्हटलं की मला असंच बनायचंय. तेव्हा माझ्या वडिलांनी मला तायक्वांदोचा क्लास लावला. त्यानंतर मी शाळेतील स्पर्धेत गोल्ड जिंकलं. नंतर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत सहभाग घेतला. आता मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून भारतासाठी मेडल आणायचंय', असा विश्वास साईराजने व्यक्त केला. साईराजच्या या यशाबद्दल त्याचे वडील सचिन नलावडे यांनीही त्याचे कौतूक केले. 'तो लहानपणापासून तायक्वांदो शिकतोय. आमची इच्छा आहे की त्याने अशीच कामगिरी पुढे करावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करावं', असे ते म्हणाले.
हेही वाचा :