पुणे : Rutuja Bhosale On Tennis : 'एशियन गेम्स २०२३' या स्पर्धेतील 'टेनिस मिक्स डबल'मध्ये रोहन बोपण्णा यांच्या बरोबर पुण्यातील विजेती ऋतुजा भोसले हिने सुवर्णपदक जिंकलं आहे. आज पुण्यात तिचा विविध क्षेत्र तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील संघर्षावर प्रकाश टाकला. ती म्हणाली की, टेनिस खेळत असताना एक वेळ अशी आली होती की ज्या वेळेस मला असं वाटलं होतं की, मी टेनिस सोडून द्यावे; मात्र त्यानंतर झालेल्या आर्थिक मदतीने आज मी हे सुवर्णपदक जिंकलं असल्याचं मत भोसले हिने व्यक्त केलं.
तेव्हाचा क्षण खूपच आनंददायी: 'एशियन गेम्स'मध्ये ऋतुजा भोसले हिने सुवर्णपदक जिंकल्याबाबत ती म्हणाली की, मला अजूनही विश्वास होत नाही की मी 'एशियन गेम्स'मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. मला खूपच आनंद होत आहे. मॅच संपली तेव्हा तर काही सेकंद सगळंच शांत झालं होतं; पण तेवढ्यात रोहन बोपण्णा याने मला उचलून आनंद व्यक्त केला. तेव्हाचा हा क्षण खूपच आनंददायी होता, असं यावेळी भोसले हिने सांगितलं.
बोपन्ना यांच्या टीप्सचा फायदा: ती पुढे म्हणाली की गेली 30 वर्षे रोहन बोपण्णा हे टेनिस खेळत आहेत आणि त्यांच्याबरोबर टेनिस खेळताना खरचं एक दडपण होतं; पण त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यांनी दिलेल्या टिप्स तसेच खेळत असतानाचा अनुभव खूपच चांगला होता. पहिल्या दोन मॅचमध्ये रोहन बरोबर खेळत असताना खूपच दडपण होतं; पण नंतर ते हळूहळू कमी झालं आणि खूपच काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं असल्याचं यावेळी भोसले हिनं सांगितलं.
यशाचे श्रेय आई-वडिलांना: ऋतुजा भोसले तिच्या संघर्षाबाबत म्हणाली की, मी जो काही संघर्ष केला आहे आणि आज जे काही मला यश मिळालं आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांना आहे. कारण मागच्या वर्षी खूपच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. टेनिससाठी जे 30 ते 35 आठवडे खेळायचे होते ते होत नव्हतं. आर्थिक परिस्थितीही बिकट झाली होती आणि तेव्हा टेनिस सोडून द्यायचा विचार केला होता; पण त्यानंतर काही लोकांनी केलेल्या मदतीमुळे आज हे सुवर्णपदक जिंकलं असल्याचं मत यावेळी ऋतुजा भोसले हिने व्यक्त केलं आहे.
हेही वाचा:
- IOC Session Mumbai 2023 : आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची १४ ऑक्टोबरपासून मुंबईत बैठक; तर क्रीडा मंत्र्यांनी केली 'ही' मागणी
- Cricket World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीसीबी प्रमुख भारतात येणार
- Narendra Modi Meet Players : पंतप्रधान मोदींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेतली, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन