बारामती - शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणे व ठीकठिकाणचे रोहित्र काढणे तात्काळ थांबवावे. या मागणीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. बारामती येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडण्याची मागणी
ज्या शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्श महावितरणकडून तोडण्यात येत आहेत. तसेच अनेक ठिकाणचे रोहित्र देखील काढण्यात येत आहेत. वीज नसल्याने शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही, पाणी नसल्याने पीक सुकून चालले आहे. त्यामुळे महावितरणने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज कनेक्श तोडणे थांबवावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे, त्यांना पुन्हा वीज जोडणी द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी देखील वीजबिल माफीचे अश्वासन दिले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही. याला शासन जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी रासपच्या वतीने करण्यात आला आहे.