बारामती (पुणे) - कोरोनासारख्या वैश्विक महामारीचे थैमान अद्याप सुरूच असताना एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारला आर्थिक धोरण आखण्याचा सल्ला दिला आहे. अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि आरबीयकडून मिळालेले पैसे वापरण्याचा केंद्र सरकारला सल्ला देत त्यांनी ट्विट केले.
'अर्थसंकल्पातील तरतुदींचा वापर करावा'
देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि आरबीयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील,असा आमदार रोहित पवार यांनी केंद्राला सल्ला दिला आहे.
'जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाट्यानुसार राज्यांना निधी द्यावा'
तसेच यावेळी त्यांनी कोरोना रोखण्यासाठी कसे नियोजन केले पाहिजे याचाही सल्ला केंद्राला दिला. राज्ये स्वतःच्या पायावर उभी राहिली तर देश उभा राहील. त्यासाठी राज्याची लोकसंख्या, तिथे कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव आणि जीएसटीमध्ये संबंधित राज्याचा वाटा, यानुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीचे प्रमाण ठरवावे असे त्यांनी सुचवले. असे केलं तर कोरोनावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादीच उपलब्ध नाही!