पुणे - ईव्हीएमबद्दल काही लोकांनी शंका व्यक्त केली, त्यामुळे अस झाले तर लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. त्या वक्तव्याला बारामतीच्या पराभवाची भीती असे म्हणता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी म्हटले आहे. ते पवारांवर होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
पवार कुटुंबीयातील रोहित पवार हे गेल्या काही काळापासून आक्रमकपणे समाजकारणा बरोबरच राजकारणात ही उतरल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणूक ते नगर जिल्ह्यातील कर्जत किंवा पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढवणार अशी चर्चा आहे. रोहित पवार यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार मात्र कुठला मतदारसंघ ते अजून निश्चित नाही, पक्षाचे वरिष्ठ त्याबाबत ठरवतील असे पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार यांच्या सृजन फाऊंडेशनच्या माध्यमातून या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी व्यवसायातील संधी याबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, याची माहिती देण्यासाठी रोहित पवार पुण्यात आले होते. त्यावेळी रोहित पवार बोलत होते.
मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेले आणि रोहित पवार यांचे चुलत भाऊ पार्थ पवार यांच्याबाबत बोलताना पार्थ पवार हे निश्चित निवडून येतील, असा विश्वास रोहित यांनी व्यक्त केला. मावळमध्ये पहिल्या भाषणावरून ट्रोल झालेले पार्थ पवार यांनी नंतरच्या पंधरा दिवसात त्यांनी खूप सुधारणा केली आणि शेवटचे भाषण चांगले केले त्यामुळे ते खासदार होतील, आणि पुढील पाच वर्षे ते नक्की चांगल काम करतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.