पुणे - चिंचवडमध्ये तीन अज्ञात चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून एका डॉक्टरच्या घरी डल्ला मारत तब्बल ५० तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मीनाक्षी किसनराव बागडे (वय ५२) यांनी चिंचवड पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला आणि डॉक्टर पती हे त्यांच्या मूळगावी आईला भेटायला गेले होते. तेव्हा, चोरांनी संधी साधून घरावर डल्ला मारत १५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तक्रारदार महिलेचे पती हे शासकीय रुग्णालयात डॉक्टर आहेत. तर मीनाक्षी या निगडी प्राधिकरण येथे खासगी रुग्णालयात परिचारिका आहेत. ते गेली अनेक वर्षे चिंचवडमधील हर्षदा कॉ. हाउसिंग सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतात.
गेल्या आठवड्यात बागडे कुटुंब हे फलटण येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन सोमवारी रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे करत आहेत.