पुणे - बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. शेजारणीने त्याच चावीच्या सहाय्याने बनावट चावी तयार करुन एका मैत्रिणीच्या मदतीने वेळोवेळी चोरी केल्याची घटना घडली. घरात चोरी करणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली असून, भारती भगवान असवानी (वय-60) आणि सुवर्णमला बूथवेल खंडागळे (वय-59) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सपना जिग्नेश शहा (38) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
हेही वाचा - धक्कादायक! पुत्रप्राप्ती आणि गुप्त धनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार एकाच सोसायटीमध्य राहतात. तक्रारदार महिला जेव्हा बाहेर जायला निघायच्या तेव्हा त्या भारती असवानी यांच्याकडे घराची चावी ठेवून जात असत. दरम्यान, भारती असवानी यांनी बनावट चावी तयार केली आणि जेव्हा जेव्हा शहा कुटुंबीय बाहेर गावी जायचे तेव्हा दोन्ही आरोपी महिला बनावट चावीने कुलूप उघडून चोरी करत असत. हा प्रकार जून 2018 ते फेब्रुवारी 2020 या काळात सातत्याने घडत होता. या कालावधीत तक्रारदार यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला होता.
घराचे कुलूप न उघडताही चोरी होत असल्याने शहा कुटुंबीय हैराण होते. अखेर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि कनेक्शन इंटरनेच्या माध्यमातून मोबाईलला जोडले. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या भारती असवानी यांना मुंबईला जात असून, घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु मुंबईला न जाता ते जवळच असणाऱ्या फ्लॅटमध्ये राहण्यास गेले. ते तिकडे जाताच आरोपी महिलांनी बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि बेडरुममधील कपाट उघडून शोधाशोध सुरू केली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ घरी धाव घेत आपल्या शेजाऱ्यांना घरात चोरी करताना रंगेहाथ पकडले आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे.
हेही वाचा - उन्नाव प्रकरण: दोषी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याचे विधानसभा सदस्यत्व रद्द