पुणे - नवले ब्रीज जवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. काल (मंगळवार) सकाळी हा अपघात घडला असून या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. एक इसम पूजेचे साहित्य घेऊन नवले ब्रिजवरून कात्रजच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात मृत व्यक्तीच्या डोक्यावरून बोअरवेलच्या गाडीचे चाक गेले आणि या इसमाचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकचालक अटकेत -
नवले ब्रीज जवळ अण्णा वडेवाले या हॉटेल समोर बोअरवेल ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. ह्यात दुचाकीवरील इसमाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नवले पुलाजवळ सतत अपघाताचं सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी या परिसरात एक अपघात झाला होता आणि त्यात देखील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. मात्र अजूनही प्रशासनाकडून उपययोजना केल्या जात नाहीत.