पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या बालेकिल्ल्यात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा मैदानात उतरलेत. ही लढत अत्यंत अतितटीची मानली जात आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला मावळ लोकसभा मतदारसंघ २०१९ ला तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहे. पुणे जिल्ह्यातील ३ आणि रायगड जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांना एकत्र करून नव्याने तयार झालेला हा मतदार संघ आहे. राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक विविधतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. आतापर्यंत झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने तिसऱ्या वेळीही बाजी मारत हॅट्रिक साधायचा प्रयत्न शिवसेना करत आहे. राष्ट्रवादी ही जागा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
पक्षीय बलाबल
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या ३ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. हा मतदारसंघ अर्धे पुणे आणि अर्धे कोकण असे प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे.
1) पिंपरी - गौतम चाबूकस्वार (शिवसेना)
2) चिंचवड - लक्ष्मण जगताप (भाजप)
3) मावळ - बाळा भेगडे (भाजप)
4) पनवेल - प्रशांत ठाकूर (भाजप)
5) उरण - मनोहर भोईर (शिवसेना)
6) कर्जत - सुरेश लाड (राष्ट्रवादी)
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघाने पहिली निवडणूक पाहिली ती २००९ मध्ये. या निवडणुकीत लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि शिवसेनेच्या गजानन बाबर यांच्यात. त्यात बाबर यांनी तब्ब्ल ८० हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला. बाबर यांना ३ लाख ६४ हजार ८५७ मते मिळाली. तर पानसरे यांना २ लाख ८४ हजार २३८ मते मिळाली. २०१४ मध्येही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगेल अशी चिन्हं होती. पण ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली आणि राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्यासाठी धावा धाव करावी लागली. अखेर राहुल नार्वेकर यांना बळीचा बकरा करत राष्ट्रवादीने उमेदवार शोधला. तर शिवसेनेकडून पुन्हा गजानन बाबर यांना संधी मिळेल असे वाटत असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली.
मोदी लाटेच्या परिणामामुळे बारणे यांनाही अपेक्षित नसलेला विजय मिळाला. बारणे यांनी जगताप यांच्यावर तब्ब्ल १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीची तर पुरती धूळधाण झाली.
२०१४ नंतर आता परिस्तिथी प्रचंड बदलली आहे. या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. बारणे यांचे कट्टर विरोधक आणि उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी केव्हाच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीच्या काळात जगताप हे पवारांचे काम करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरून भाजप नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर लक्ष्मण जगताप हे आता श्रीरंग बारणेंचे काम करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी संपूर्ण यंत्रणा पार्थ पवार यांच्यासाठी जोमाने कामाला लावली आहे.
कधी काळी राष्ट्रवादीची या मतदारसंगात सर्वाधिक ताकत होती. मात्र, सध्या राष्ट्रवादीसाठी परिस्तिती कठीण बनली आहे. अशातच अजित पवारांनी गेल्या काही काळात चांगली मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे रायगडमध्ये वर्चस्व असलेला शेकाप पक्ष आघाडीत असल्याने शेकापची ताकदीवरही राष्ट्रवादी काँग्रेसची बरीच मदार असणार आहे.
मतदारसंख्या एकूण - 22 लाख 27 हजार 133
या मतदारसंघातील उल्लेखनीय बाब म्हणजे नवमतदारांची संख्याही लक्षणीय आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी नव मतदारांची संख्या ही साडेतीन लाखापेक्षा जास्त आहे. गेल्या १० वर्षात मावळ मतदारसंघात तब्बल 6 लाख 25 हजार नवमतदारांची वाढ झालेली आहे. त्यामुळे हा मतदार कुणाच्या बाजूने जातो यावर बरीच गणितं आवलंबून असणार आहेत.
सलग ५ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणारे बारणे विरुद्ध राजकारणात पाऊल ठेवणारे नवखे पार्थ पवार यांच्यातील लढत रंगतदार ठरणार आहे. देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्याची अपेक्षा बाळगून असलेले भाजपचे कार्यकर्तेही सक्रिय सहभागी झाले आहेत. सद्यःस्थितीत ६ विधानसभा मतदारसंघांपैकी कर्जत वगळता अन्य ५ ठिकाणी युतीचे आमदार आहेत. त्यामुळे 'राष्ट्रवादी'ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. घराणेशाहीची पुण्याई पार्थ यांच्या पाठीशी आहे. तर, युतीची निष्ठा बारणेंना तारणारी आहे. त्यामुळे येथून कोण बाजी मारणार हा येणारा काळच ठरवेण.