पुणे: कसबा गणपती हा पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. कसबा गणपतीचे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे सांगितले जाते. शहराच्या मध्यवस्तीत शनिवारवाड्या जवळच कसबा गणपतीचे मंदिर आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे. कसबा ही पुण्याची मुळ वस्ती आहे. शहाजीराजे भोसले यांनी १६३६ साली पुण्यात लाल महाल बांधला. तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी या गणपतीच्या स्थापनेसाठी मंदिर बांधले. या गणेशाची मूर्ती स्वयंभू असून, ती साडेतीन फूट उंचीची आहे. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून हा गणपती मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो.
![kasba ganpati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-08-manacha-pahila-ganpati-kasba-ganpati-etihas-avb-7210735_25072022185535_2507f_1658755535_1010.jpg)
तांदळा स्वरूपात गणपती : कर्नाटकातुन आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने या कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले. या मागे देखील एक आख्यायिका आहे, राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली. या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे.
![kasba ganpati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-08-manacha-pahila-ganpati-kasba-ganpati-etihas-avb-7210735_25072022185535_2507f_1658755535_8.jpg)
'जयति गणपति' अशी ही ओळख : कसबा गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गणपती प्रसिध्द आहे. मंदिराजवळील लाल महालातच शिवरायांचे बालपण गेले. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. मान्यवरांच्या हस्ते पालखीतल्या गणपतीची पुजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला 'जयति गणपति' असे म्हणतात. आजही घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणले जाते. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.
![kasba ganpati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-08-manacha-pahila-ganpati-kasba-ganpati-etihas-avb-7210735_25072022185535_2507f_1658755535_215.jpg)
यंदा मंडळाचे 130 वर्ष: श्री कसबा गणपती मंडळ गेली 129 वर्ष उत्सवाचा मूळगाभा जो आहे की धर्माच्या छत्रीखाली लोकांचं संघटन करून समजाच प्रबोधन करणे.त्यानुसार मंडळ काम करत आहे.तसेच अत्यंत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे हा मंडळाचा वैशिठ्य आहे.आणि त्यानुसार च मंडळ यंदाही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार असून चांदीच्या पालखीत बाप्पाची मिरवणूक ही निघणार आहे.आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.आणि धार्मिक कार्यक्रमांसह समाज प्रबोधनासाठी व्याख्याने देखील होणार असल्याची माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे यांनी यावेळी दिली.