पुणे - जगभर कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यात आणि देशातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गर्दी करून कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबीयांसह घरीच साजरी करत अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आंबेडकरी जनतेला करण्यात आले आहे.
'रिपाइं'चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी पत्रक काढून राज्यभरातील आंबेडकरी कार्यकर्ते आणि समाजाला जयंतीनिमित्त गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. विविध पक्षाचे कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना यांनी पुतळ्यावर जमा होऊ नये, मिरवणुका काढू नयेत, रस्त्यावर येऊन गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करू नयेत, असे या पत्रकात म्हटले आहे. कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे कमी झाल्यानंतर जयंती साजरी करावी, असेही यात म्हटले आहे.
बाळासाहेब जानराव म्हणाले, कोरोनामुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. राज्य सरकार आणि प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेत आहे. अशावेळी गर्दी करून कोरोनाच्या नियंत्रणात आडकाठी होणार नाही, यासाठी 'रिपाइं' कायमच प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी तबलिगी समाजाच्या मरकझमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, तशी परस्थिती आंबेडकर जयंतीमुळे उद्भवू नये, या उद्देशाने जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांनी, विविध संस्था व संघटनानी शहरातील विविध ठिकाणच्या आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढू नयेत. काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या असल्याचेही जानराव यांनी नमूद केले.