पुणे - अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पहाटे ५.०० वाजता दुग्धाभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने आज दुपारी बारा वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी, या उद्देशाने पवित्र चंदन उटीचा लेप दरवर्षी महाराष्ट्र दिनी करण्यात येत असतो. या चंदन उटीच्या लेपामध्ये महागणपतीची मूर्ती विलोभणीय दिसत होती. या वर्षीचा पूजेचा मान गणेशभक्त सुरेंद्र वधवा व प्रसिद्ध उद्योजक सचिनशेठ दुंडे यांच्यावतीने महागणपतीला चंदन उटी लेप आणि 101 किलो सफरचंदचा महानैवेद्य देण्यात आल्याचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भाविकांना दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद असून "श्रीं" ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू असल्याचे विश्वस्त प्रा. नारायण पाचुंदकर यांनी सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे डॉ.संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.