पिंपरी चिंचवड Record Break Cycle Rally : शहरात ‘ इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2023’ चे आयोजन केले गेले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. 'आपली इंद्रायणी नदी (Indrayani River) सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी' हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड नगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला होता. पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल ३० हजार ३७० हून अधिक सायकलपटूंनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद : यावेळी ‘ रिव्हर सायक्लोथॉन टीम’ ने ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद केली. त्याचे प्रमाणपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, कुस्तीपटू नरसिंह यादव यांच्यासह महापालिका, पोलीस अधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार : आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, एव्हढ्या सकाळी नागरिक नदी स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सायलिंगसाठी काम करीत आहे. प्रशासनाला यावर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे योगदान महत्त्वाचे आहे.
सायकलपटूंचे केलं कौतुक : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी रिव्हर सायक्लॉथॉनची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आमदार महेश लांडगे यांचं अभिनंदन करतो. सर्व संस्था, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तींमुळे पिंपरी-चिंचवडचे नाव जगभरात करणारे आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या सायकलपटूंचे कौतुक करतो. आरोग्यदायी जीवनासाठी सायकलपटूंनी सातत्य ठेवावे. ५, १५ किलोमीटर स्पर्धा होत आहेत. पुढील वर्षी ३५ किमी लांब सायकल रॅली स्पर्धा करावी, अशी अपेक्षाही चौबे यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक रिव्हर सायक्लॉथॉन रॅली : नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीमध्ये सायकलपटूंनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी सायकल रॅली ठरली आहे. विशेष म्हणजे, ‘ रिव्हर सायक्लोथॉन टीम’ ने ‘लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. सर्व सायकलपटू, पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या लक्षवेधी प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो, अशा भावना मुख्य समन्वयक निलेश लोंढे यांनी व्यक्त केल्या आहेत.
पैलवान आला गं… गाण्यावर आमदार लांडगेंचा ठेका..! : रिव्हर सायक्लोथॉनच्या निमित्ताने आयोजित झुंबा डान्स् कार्यक्रमात आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी ‘पैलवान आला गं… ’ गाण्यावर ठेका धरला. तसेच, आशिष आहेर यांनी आमदार लांडगे यांनी काढलेले ‘स्केच’ भेट देण्यात आले. सलग ३३ वर्षे आळंदी ते लांडेवाडी सायकलवारी करणारे आणि ७० वर्षांपासून सायकल चालवणारे ८१ वर्षीय अशोक विष्णूपंत बेलापूरकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सलग ६६ दिवस महाराष्ट्रामध्ये साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करुन गडकिल्ले सर करणारे सायकल मित्रचे प्रकाश पाटील यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी घुले यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले.
पर्यावरण रक्षण आणि फिटनेसचा संदेश : नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी अविरत श्रमदान आणि सायकल मित्र संघटनेच्या पुढाकाराने ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजित करण्यात येते. जर्मनीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी ६० देशांनी प्रयत्न केले. मात्र, भारताने हे रेकॉर्ड मोडले. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण आणि फिटनेसचा संदेश देण्यात येत आहे. या रॅलीला ऐतिहासिक प्रतिसाद दिला. याबद्दल सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचे आभार व्यक्त करतो.
हेही वाचा -