पुणे - सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच गुन्हेगारांचा बिमोड करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य चोख बजावत पुण्यातील महेश निंबाळकर या पोलीस कर्मचाऱ्याने मागील 7 वर्षात 172 वॉन्टेड गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. तर, मागील 3 महिन्यात त्यांनी 22 कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महेश निंबाळकर हे 29 वर्षांपासून पोलीस सेवेत असून मागील 5 वर्षांपासून ते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. फरार असलेल्या गुंडांना पकडण्यात निंबाळकर यांचा हातखंडा आहे. पुण्यातील येरवडा परिसरात 1997 साली, एका ज्वेलर्सवर दरोडा टाकून 40 लाखाचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. यातील विलास उर्फ अविनाश विश्वनाथ भालेराव हा आरोपी 22 वर्षांपासून फरार होता. निंबाळकर यांनी खबऱ्यांमार्फत त्या आरोपीची माहिती काढून त्याला नुकतीच अटक केली आहे.
हेही वाचा - पुण्यात वयोवृद्ध दांपत्याच्या घरात चोरी करणाऱ्या चोराला अटक
याशिवाय चतु:शृंगी पोलीस स्टेशनमधील 11 गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आणि 20 वर्षापासून फरार असलेला आरोपी बुद्धीवान उर्फ विजय मारुती जाधव यालाही अटक केली. 19 वर्षांपासून फरार असलेला आतंरराज्यीय गुन्हेगार संजय नामदेव कांबळे यालाही जेरबंद केले. यातील बहुतांश आरोपी घरफोडी, दरोडे, हाफ मर्डर यासह अनेक गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड आहेत. मात्र, निंबाळकर यांनी आपले कसब पणाला लावून अनेकांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत त्यांना 200 हुन अधिक रिवार्ड मिळाले आहेत.
हेही वाचा - पुण्यामध्ये मित्राला सुपारी देऊन पत्नीने केला पतीचा खून; सततचे भांडण ठरले कारण
या आरोपींना पकडण्यासाठी कधी कधी जीवावर उदार व्हावे लागत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यातील कित्येक आरोपींना पाठलाग करून पकडले तर अनेकांसोबत झटापट झाल्याचेही ते म्हणाले. खबऱ्यांचं जाळं मजबूत असल्यामुळेच मी या सर्व फरार आरोपींना पकडण्यात यशस्वी झालो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
हेही वाचा - 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'