पुणे - विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील इतर इच्छुक नाराज झाले आहेत. भाजपची पुण्यातील उमेदवार यादी आल्यानंतर काही मतदारसंघात इच्छुकांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरीची भाषा केली होती. आता काँग्रेसमध्येही बंडखोरी होताना दिसत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक असलेले नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी तिकीट न मिळाल्याने कसबा विकास आघाडीची घोषणा करत अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा- भाजपचे 'कुबेर'..! मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क
धंगेकर हे गेली 20 वर्ष कसबा मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून जात आहेत. 2009 तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गिरीश बापट यांना जोरदार टक्कर दिली होती. 2009 ला मनसेकडून लढताना ते दुसऱ्या स्थानावर होते. तर 2014 मध्ये ही त्यांनी जोरदार लढत दिली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. या परिसरात असलेले काम आणि लोकांचा पाठींबा पाहता काँग्रेसकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा त्यांचा होरा होता. मात्र, काँग्रेसने महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्याने धंगेकर नाराज झाले. अरविद शिंदे यांच्याशी काही वाद नाही. मात्र, ते या मतदारसंघातले नाहीत तसेच या मतदारसंघात मला लोकांचा पाठींबा असताना पक्षसाने मला का तिकीट नाकारले हे कळत नाही, असे सांगत आता लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर अपक्ष लढणार असल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले. दरम्यान धंगेकर यांना भेटून त्यांची नाराजी दूर करू, असा विश्वास अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला आहे.