पुणे: पिडीत मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर याबाबत रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौालयात (Rape of girl in a public toilet ) हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उदरनिर्वाहासाठी साफसफाईची कामे करते. शुक्रवारी दुपारी ती सार्वजनिक शौचालयात गेली होती. यावेळी आरोपी तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. तिला खाली पाडून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
पीडित मुलगी कुटुंबीयांसह राहते. तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगला ओळखीचा असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. हा गुन्हा केल्यापासून तो बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नराधम फरार झाला आहे. महाराष्ट्रात अराजक माजले आहे. सत्ताधाऱ्यांची सगळी शक्ती विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी खर्ची पडतीये. त्यामुळे समाजकंटकांचे फावले आहे. अशी टीका भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर केली आहे.
तर पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास दिले आहेत. अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.