पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधीच्या भूमिकेमध्ये विसंगती आहेत. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. पण, तातडीने परीक्षा घ्याव्यात या मताचा नाही, असे ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, 'राज्यपाल यांचे म्हणणे लगेच परीक्षा घ्या, असे अजिबात नाही. परीक्षा घेतल्या शिवाय गुणवत्ता सिद्ध करता येणार नाही. राज्यपालांचे म्हणणे बरोबर आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.'
राज्य संकटात हरवलेले असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी राज्यपाल ही एक मोठी शक्ती आहे. मुख्यमंत्री हे तर महाराष्ट्राचे मुख्य आहेतच. मात्र राज्यपालांना काहीच अधिकार नाहीत, अशा पद्धतीची भूमिका घेणे चूकीचे आहे. राज्यपालांनी कोरोना संबंधी बैठक घेतली तर तिथे दोन सत्ता केंद्र होत असल्याचे मानण्याचं कारण अजिबात नाही. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. यात वाद घालायची अजिबात आवश्यकता नाही. परीक्षा घेतल्या पाहिजेत या मताचा मी आहे. पण तातडीने घ्याव्यात या मताचा नाही, असे आठवले म्हणाले.
दरम्यान, तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी-जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचं ठरवले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यावर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे राज्यपालांनी म्हटलं. यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
हेही वाचा - 'मुख्यमंत्री कोरोनाचा सामना करू शकले नाहीत; सरकारच्या बेशिस्तपणानेच रुग्णसंख्या वाढली..'
हेही वाचा - 'आषाढी वारीतून कष्टकरी, बळीराजाला बळ मिळू दे' कार्तिकी गायकवाडचे पांडुरंगाला साकडे