पुणे - पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम जवळपास चांगला होत आला. मात्र, सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. प्रत्येक अडचणीच्या काळात बैल शेतकऱ्याच्या सोबत असतो. बैलाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करतो. भाद्रपद पोळ्यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत.
काबाडकष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण महत्त्वाचा समजला जातो. प्राचीन काळापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपद अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बळीराजा आपल्याकडे असणाऱ्या व मातीपासून तयार केलेल्या बैलांना सजवतो. त्यांची पूजा करून वाजत-गाजत मिरवणूक काढतो.
हेही वाचा - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके बुडण्याच्या मार्गावर...
मातीचे बैल, बैलांसाठी गळ्यातील घुंगरूमाळा, कपाळाला बाशिंग, वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, गळ्यातील माळा अशा विविध साहित्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरची बाजारपेठ सजली आहे. मात्र, काही ठिकाणी दुष्काळ, अतिवृष्टी आणि बाजारपेठेतील मंदी याचे सावट बैलपोळा सणावर जाणवते आहे.