पुणे- कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी पोलीस, पत्रकार आणि इतर सर्व यंत्रणा झटत आहे. मात्र, हे कार्य करताना या यंत्रणांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी राजगुरूनगर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापती संपदा सांडभोर यांनी मास्कचे वितरण केले आहे.
राजगुरुनगर शहरात सध्या लॉकडाऊन आहे. त्यातच नगरपरिषदेच्या आवाहना नंतर व्यापारी वर्गाने स्वतःहून दुकाने बंद ठेवल्याने गेल्या सहा दिवसांपासून शहर पूर्णतः बंद आहे. या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी महसूल व आरोग्य कर्मचारी, पत्रकार कोरोना विषाणूचे निर्मुलन करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना मास्कची आवश्यकता आहे, मात्र मास्क महाग असल्याने व ते घेण्यासाठी वेळ नसल्याने गरज ओळखून सभापती संपदा सांडभोर यांनी स्वतः मास्क बनवलेत. त्यानंतर, सांडभोर यांनी ते मास्क सदर यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना मोफत वाटले आहे.
प्राथमिक स्वरुपात पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पेसह पोलीस कर्मचाऱ्यांना, जैन धर्मार्थ रुग्णालयातील डॉक्टर, परिचारकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मछिंद्र घोलप, नगरसेविका रेखा क्षोत्रिय, सारिका घुमटकर, विजय भन्साळी, संतोष बोथरा आदी उपस्थित होते. कोरोना विषाणूची महामारी दूर करण्यासाठी मास्कचा सर्वांनी उपयोग करावा. समाजात जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याची गरज आहे, म्हणून स्वतः मास्क तयार करून त्याचे वाटप केले असल्याचे संपदा सांडभोर यांनी सांगितले.
हेही वाचा- अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा; बारामती पोलिसांची कारवाई