पुणे : शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने वर्गात शिकवताना देवी- देवतांबाबत चुकीचे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याने अशोक ढोले या प्राध्यापकाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे डेक्कन पोलीस ठाण्यात दोन धर्मात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक विपीन हसबनिस यांनी दिली आहे. अशोक ढोले यांनी आठ दिवसापूर्वी वर्गात शिकवताना हिंदू देवी-देवतांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने अशोक ढोले यांना निलंबित केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन : बुधवारी रात्रीपासून पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते अशोक ढोले या प्राध्यापकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसले होते. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी चारच्या दरम्यान अशोक ढोले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावल्यामुळे अशोक ढोलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक : शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकवताना अशोक ढोले या प्राध्यापकाने हिंदू देवी आणि देवतांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे शहरातील हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांनी अशोक ढोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा पवित्रा घेतला होता. अशोक ढोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या रविंद्र पडवळ यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
प्राध्यापकाच्या निलंबनाची मागणी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अशोक ढोले या प्राध्यापकावर गंभीर आरोप केले आहेत. हा प्राध्यापक आमच्या देवी देवतांवर सातत्याने अपमान करत असल्याने त्याचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलकांनी डेक्कन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले आहे. त्यासह अशोक ढोले कार्यरत असलेल्या महाविद्यालयातही आंदोलन करण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीची योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी दिली आहे.
हेही वाचा -