पुणे - चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या युट्युबद्वारे पसरवणाऱ्या २ युट्युब चॅनेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आंध्रप्रदेश, काकीनाडा येथून मोहम्मद अब्दुल सत्तार याला अटक केली. तर, उत्तर प्रदेशातील बाभानवली बुजुर्ग येथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चिकन खाल्ल्याने कोरोना होतो' अशी अफवा पसरवल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना अशाप्रकारे अफवा पसरवणारे दोन व्हिडीओ उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून युट्युबवर अपलोड झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी त्या-त्या राज्यात जाऊन कारवाई केली. यातील एकाला अटक केली तर, अल्पवयीन असलेल्या एका मुलालाही ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तुळशीबाग 3 दिवस बंद
दरम्यान, आरोपींनी सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओची कुठलीही खातरजमा न करता हे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोणत्याही कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना आजार होतो, हे पूर्णतः अशास्त्रीय आणि अफवा आहेत. पशुसंवर्धन खात्याने यापूर्वीच हे घोषित केले आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासोबच सध्या अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारे जे व्हिडिओ शेअर करण्यात येत आहेत, त्याचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनामुळे तमाशा कलावंताच्या कलेचा तमाशा....