पुणे - पुणेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रोची बोगी रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली होती. आज (30 डिसेंबर) या बोगी रुळावर ठेवण्यात आल्या असून काही दिवसांमध्ये मेट्रोची ट्रायल घेण्यात येणार आहे. बोगी बसवण्याचे काम पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना आतुरता असलेल्या मेट्रोच्या सहा बोगी अखेर रुळावर विसावल्या आहेत. रविवारी नागपूरहून सात दिवसांचा प्रवास करून सहा बोगी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या होत्या. या बोगींचे शहराच्या भक्ती-शक्ती चौकात येताच पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते.
हेही वाचा - पुणे मेट्रोची लवकरच होणार चाचणी; कोचच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा पाच किलोमीटरपर्यंतचा मार्ग पूर्ण झाला आहे. त्यामुळे, मेट्रो प्रशासनाचा नववर्षात चाचणी घेण्याचा मानस आहे. आज सकाळी मेट्रोच्या बोगी क्रेनच्या साहाय्याने मुख्य रुळावर ठेवण्यात आल्या. २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर युद्धपातळीवर मेट्रोचे काम करण्यास सुरवात झाली.