पुणे - कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची अवस्था पाहता त्यांच्याजवळ जाण्यास कोणीही धजावत नाही. अगदी नातेवाईकही त्यांच्याजवळ जाण्यास घाबरत असल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोघांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनाच त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यावर कशाप्रकारे अंत्यसंस्कार करावेत यासंदर्भात नियमावली घालून देण्यात आली आहे. त्यासाठी PPE (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) कीट वापरणे गरजेचे आहे. मात्र, ही PPE कीट नसल्यामुळे एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह तीन तास येरवडा येथील स्मशानभूमीत पडून होता. PPE कीट नसल्यामुळे मृतदेह उचलायचा कुणी हा प्रश्न पडला होता.
अखेर रात्री उशिरा महापालिका कर्मचारी PPE कीट घेऊन आले आणि अंत्यसंस्कार पार पडले. त्यामुळे मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांचे हाल संपवण्याची चिन्ह दिसत नाही. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र हा सर्व प्रकार महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे घडल्याचे सांगितले. PPE कीट नसल्यामुळे अंत्यसंस्काराला उशीर झाला असे सांगितले जात असले तरी हे सत्य नाही.
सुरुवातीला हा मृतदेह ज्या स्मशानभूमीत नेला तेथील विद्युतदाहिनी बंद असल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकारची माहिती घेतली जात असून असा प्रकार पुन्हा होणार नाही यासंबंधी खबरदारी घेतली जाईल. पुणे महापालिकेकडे पुरेसे PPE कीट उपलब्ध आहेत. राज्यशासनाकडून आणखी काही PPE कीट येणार आहेत. महापौरांच्या निधीतूनही या कीटसाठी 50 लाख देण्यात आले आहेत. यापुढच्या काळात या किटची कमतरता भासणार अशी तरतूद करण्यात आली आहे.