पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. आडते असोसिएशनच्या वतीने 20, 21 आणि 22 मार्चला मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून हा बंद सुरू झाला असून मार्केटयार्डमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी आजपासून कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात केली आहे.
सुरुवातीला 20 आणि 21 मार्च रोजीच हा बंद पाळण्यात येणार होता मात्र, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जनता कर्फ्यु'चे आवाहन केल्यानंतर बंद आणखी एक दिवस वाढवण्यात आला. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्डमधून संपूर्ण पुणे शहराला भाजीपुरवठा करण्यात येतो. मार्केट बंद असल्याने आता पुणेकरांची गैरसोय होणार आहे. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा - #COVID19 : आदेश डावलले..! पिंपरी-चिंचवडमधील 62 दुकानदारांवर गुन्हे दाखल
राज्यातील कोरोनाचा पहिला रूग्ण हा पुणे शहरात आढळला होता. ही संख्या वाढून आता 19 वर जाऊन पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशातून भारतात परतलेल्या कोरोना बाधित रूग्णांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तरी देखील शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, 'सोशल डिस्टंसिंग' नियम अधिक काटेकोरपणे पाळण्याची गरज असून येत्या काळात ते अधिक कठोर केले जातील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी सांगितले.