पुणे - देशभरात एकीकडे 'मुलगी वाचवा देश वाचेल' असा नारा दिला जातो. तर दुसरीकडे त्याच मुलींची भर रस्त्यात छेडछाड झाल्यास, या मुली आपली बदनामी होऊ नये म्हणून घडलेल्या प्रकारावर पांघरुण टाकतात. मात्र, शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात महाविद्यालयीन तरुणीची वारंवार छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती.
या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेक स्तरांतून यामधील पोलिसांची वागणूक चुकीची असल्याचे बोलले जात होते. मात्र, या मारहाणीचे मांडवगण फराटा येथील महिलांनी आता समर्थन केले आहे. तसेच गावकरीही महिलांच्या आणि पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहून, गावातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी गावबंद करुन टव्हाळखोरांच्या विरोधात आंदोलन केले.
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून नेहमीच महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन दिले जाते. त्यावेळी अनेक मुली अगदी मनमोकळ्यापणाने सर्व गोष्टी पोलिसांना सांगतात. त्यानुसार अनेक वेळा कारवाईही केली जाते. अशा प्रकरणात पोलिसांना बऱ्याचदा कठोर भूमिका घ्यावी लागते. पोलीस सामान्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून, पुढील काळातही कायद्यानुसार काम करत राहतील. असे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.
महिला व शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या पोलिसांच्या बाजूने आता गाव उभं राहिलं आहे. त्यामुळे, जे गाव करेल ते राव करु शकणार नाही असं म्हणत गावकऱ्यांनी टव्हाळखोरांच्या विरोधात बंड पुकारले आहे.