पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात सहा वर्षीय मुलीच्या हट्टापायी आजोबा आणि वडिलांनी देशी बनावटीची विंटेज मोटार बनवली आहे. स्टायलिश, रुबाबदार असे या विंटेज मोटारीचे स्वरुप आहे. या मोटारीत स्टेअरिंग, ब्रेक आणि एक्सलेटर बसविण्यात आले आहे. या माध्यमातून ही मोटार अगदी खऱ्याखुऱ्या मोटारीसारखी विंटेज धावते आहे. ही मोटार पेट्रोलवर धावणारी आहे.
तंजीला जावेद शेख असे मोटारीचा हट्ट करणाऱ्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे. शेख कुटुंब हे पिंपरी-चिंचवड शहरात राहतात. तंजीलाचे वडील जावेद शेख हे गेल्या आठ वर्षांपासून मोटारी मॉडीफाय करण्याचे काम करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वडील हसन शेखही त्यांना कामात मदत करतात.
काही महिन्यांपूर्वी शेख कुटुंब हे मुंबईला गेले होते. यावेळी त्यांनी मॉलसह इतर ठिकाणी भेट दिली, शॉपिंग केली. मात्र, सहा वर्षीय तंजीलाला खेळण्यातील चिनी बनावटीची महागडी एक विंटेज मोटार खूप आवडली. अशाच प्रकारची मोटार हवी म्हणून तिने आपल्या वडिलांकडे हट्ट धरला. मात्र, चिनी बनावटीची मोटार महाग आणि टिकाऊ नसल्याने वडील जावेद शेख यांनी मोटार घेण्यास टाळाटाळ केली. ती कोणाचेच ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हती. अखेर तिला पालकांनी समजावले आणि अशीच कार देऊ, असे आश्वासन दिले.
त्यानंतर काही दिवसांनी कोरोना महामारीने थैमान घातले. त्यामुळे राज्य आणि केंद्रसरकार यांनी लॉकडाऊन घोषित केले. तेव्हा, मात्र वडील आणि आजोबा यांना तंजीलाची मोटारीची हौस पूर्ण करण्याची संधी मिळाली. यासाठी त्यांनी पत्र्याची शीट मागवले. त्यापासून विंटेज मोटारीची हुबेहुब डिझाइन बनविण्यात आली. मोटार धावण्यासाठी जुन्या स्कूटरचे इंजिन बनवण्याची शक्कल जावेद यांनी लावली. बोनेट, मडगार्ड आणि स्कुटीचे टायर बसविण्यात आले आहे. याप्रकारे आपल्या मुलीला मोटार बनवून द्यायची, असा चंग बांधल्यानंतर अवघ्या चार महिन्यात जावेद शेख यांनी रुबाबदार विंटेज मोटार बनवून मुलीला दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून मोबाईल आणि दुचाकी चोरणारा अटकेत
पहिल्याच प्रयोगात विंटोज मोटार बनविण्यात यश -
जावेद शेख हे एक मोटारी मॉडीफाय करणारे व्यावसायिक आहे. केवळ मुलीच्या हट्टापायी त्यांनी वेगळे करण्याचं ठरवले होते. पहिल्याच प्रयोगात त्यांना विंटेज मोटार बनविण्यात यश आले आहे. अनेकांच्या पसंतीस ही मोटार आली आहे. तर इथून पुढे स्वदेशी बनावटीच्या खेळण्यातील जास्तीत जास्त मोटार बनविण्याचा त्यांचा मानस आहे.
40 किलोमीटर प्रति वेगाने धावते विंटेज -
शेख यांनी बनवलेली मोटार ही खेळण्यातील आहे. मात्र, तिचा वेग हा मोपेड दुचाकी इतका नक्कीच आहे. किमान 40 किलोमीटर प्रति वेगाने विंटोज मोटार धावते. मोटारीला पेट्रोल टाकी आहे. त्यात तीन लिटर पेट्रोल साठवण्याची क्षमता आहे. एका लिटरमध्ये ती 25 किलोमीटर धावू शकते, असे जावेद शेख यांनी सांगितले आहे.
लहान मुलांच्या हाती मोटार दिल्यानंतर स्पीड लॉक करता येते
तंजीला मोटारीचे स्टेअरिंग घेऊन धूम स्टाईल मोटार चालवते. मात्र, मोटारीचा वेगाला मर्यादा ठेवण्यात आली आहे. तिच्या हाती मोटार असल्यास 10-15 वेग मर्यादा ठेवली जाते, असेही त्यांनी सांगितले. तर इतर, वेळी प्रतितास 40 किमीची वेग मर्यादा ठेवली जाऊ शकते.
सध्या तंजीलाच्या हाती मोटारीचे स्टेअरिंग असते. तर तिच्या शेजारी दुसरी एक मुलगी बसलेली असते. तिचा हट्ट वडील आणि आजोबांनी पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे.