पुणे : काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक टॉमेटो अत्यंत जपून वापरत आहेत. तर दुसरीकडे टोमॅटोच्या पिकामुळे अनेक शेतकरी लखपती, करोडपती झाल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे चांगले उत्पन्न घेतले आहे. त्यात खेड तालुक्यातील अरविंद मांजरे या शेतकरी पती पत्नीने अवघ्या एका एकरमध्ये टोमॅटोची लागवड करून तब्बल 15 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
अचानक टोमॅटोचे भाव वाढले : खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे राहणाऱ्या या शेतकरी दाम्पत्याने फायदा होईल, या उद्देशाने एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. जेव्हा टोमॅटो विक्री सुरू झाली, त्यावेळी टोमॅटो दोन ते तीन रुपये किलोने विकले जात होते. मात्र या जोडप्याने भावाचा विचार न करता टोमॅटोची लागवड केली. सुरुवातीला त्यांना कमी भाव मिळाला. मात्र, अचानक टोमॅटोचे भाव वाढले आणि या जोडप्याची मेहनत फळाला आली.
1500 कॅरेटमधून 15 लाखांचे उत्पन्न : त्यांनी एक एकर टोमॅटोसाठी जवळपास दिड लाख रुपये खर्च केला. सुरवातीला त्यांना 250 रूपये प्रति कॅरेट असा भाव मिळाला, नंतर नशिबाने साथ दिल्याने त्यांना टोमॅटोला जवळपास 2000 रूपये प्रति कॅरेट भाव मिळाला. त्यांना 1500 कॅरेटमधून जवळपास 15 लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. अजूनही त्यांचे टोमॅटो विकले जात आहेत. भाव वाढल्यानंतर सुरुवातीला एका कॅरेटला पंधराशे ते सतराशे रुपये इतका भाव मिळाला, नंतर हे भाव वाढतच गेले.
पत्नीने दिलेली साथ खूप मोलाची : याबाबत शेतकरी अरविंद मांजरे यांनी सांगितले की, मी एक एकर शेतामध्ये टोमॅटोच्या सहा हजार हुंड्याची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली होती. पुढील बाजारभावाचा विचार करता टोमॅटोचे पीक घेण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यावेळेस थोड्याफार शेतकऱ्यांनी टॉमेटोची लागवड केलेली होती. सुरूवातीला कमी भाव मिळाला, आज मात्र टोमॅटो पिकाने चार पैसे पदरात पाडून दिले आहेत. आता देखील शेतात टोमॅटो आहे, पण वातावरणामुळे टोमॅटो खराब होत आहेत. अजून किती टोमॅटो निघेल याबाबत काहीही शाश्वती नाही, असे मांजरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, त्यांच्या पत्नीने दिलेली साथ खूप मोलाची आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आज लखपती झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
हेही वाचा :