पुणे - विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 586 झाली असून, ॲक्टीव्ह रुग्ण 468 असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सकारात्मक बाब म्हणजे एकूण 68 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, असेही आयुक्त म्हणाले.
पुणे शहरात आज (17 एप्रिल) दिवसभरात 59 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर करोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 65 वर्षांची महिला, 30 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेतलेलेले चौघे करोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मृत व्यक्तींना विविध आजार होते. त्यात कोरोनाची बाधा झाल्यानंतर अवयव निकामी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
पुणे शहरात दहा क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातले चार ससूनमध्ये तर इतर सहा जणांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. पुणे जिल्हयात 531 बाधित रुग्ण आहेत, तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्हयात 12 बाधित रुग्ण आढळून आले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. सांगली 26 बाधित रुग्ण, कोल्हापूर जिल्हयात 6 बाधित रुग्ण आहेत.
पुणे विभागामध्ये एकूण 7 हजार 289 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 937 चा अहवाल प्राप्त आहे. तर 386 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 306 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 586 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.