पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीचे मांडवातच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला पुणेकरांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्या नागरिकांना घरच्या गणपतीचे घरी विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून, फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासून शहरातील अनेक भागात एकूण ३० फिरते हौद नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गणेश चतूर्थी म्हणजे कालपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली. आज पुणेकरांनी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले. काहींनी घरीच बाप्पाचे विसर्जन केले. तर काहींनी नगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या फिरत्या हौदात बाप्पाचे विसर्जन केले. याशिवाय काहींना फिरते विसर्जन हौद दिसले नाही म्हणून मुळा-मुठा नदीत दीड दिवसाच्या गणरायचे विसर्जन केले.
दरवर्षी शहरातील क्षेत्रीय कार्यालयाबाहेर आणि नदी पात्रात हौद तयार केले जातात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद पुणेकरांनी दिला असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षी महानगरपालिकेकडून बाप्पाच्या विसर्जनासाठी फिरते हौद तयार करण्यात आले आहेत.
एका क्षेत्रीय कार्यालयात दोन याप्रमाणे ३० पर्यावरण पूरक गणेश विसर्जन फिरते हौद, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला देण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फिरत्या हौदाचा मार्ग, वेळेचे योग्य नियोजन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांना घरीच विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट पावडर देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा - पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात अपघात; दोघे गंभीर जखमी
हेही वाचा - संतापजनक..! विवाहित मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार; मामा जेरबंद