पुणे - भ्रष्टाचारी महाभकास आघाडी सरकारने जी नोटीस पाठवली आहे ती चुकीची आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जे सत्य आहे तेच बाहेर काढण्याचा काम केलं आहे आणि आत्ता परत कोणत्या मंत्र्याचा नंबर लागणार आहे. या भीतीने या सरकारने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसचा विरोध म्हणून याची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आलं आहे, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ( Pune Mayor on Devendra Fadnavis Notice ) यांनी सांगितले. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटिसची होळी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक काय म्हणाले?
तर देवेंद्र फडणवीस यांना जी नोटीस देण्यात आली आहे. ती नोटीस नव्हे तर लोकशाहीचा खून आहे. या सरकारचे खोटाळे बाहेर काढण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना घटनेने दिला आहे. आणि ते त्यांचा कर्तव्य निभावत आहे. म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी या सरकारकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.राज्यातील जनता आणि भाजपचा एकएक कार्यकर्ते हा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहे, असं यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
फडणवीस यांनी 23 मार्च 2021 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधीची कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केली होती. संबंधित प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे आहे. याच प्रकरणामध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
या पार्श्वभुमीवर, फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी दंडसंहिता कलम 160 नुसार मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय टेलिग्राफ ऍक्ट कलम 43 ब, 66 माहिती तंत्रज्ञान अधिनीयम 2008 सुधारीत सहकलम 05, गोपनीयतेचा भंग (ऑफीशियल सिक्रेट ऍक्ट) 1923 असा उल्लेख आहे.
संबंधित प्रकरणाचा तपास मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी फडणवीस यांचा जबाब घेण्यासाठी सायबर पोलिसांनी प्रारंभी प्रश्नावली पाठविली होती. परंतु, फडणवीस यांनी संबंधित प्रश्नावलीस उत्तर दिले नाही. त्यानुसार, पुन्हा 6 सप्टेंबर 2021 या दिवशी पोलिसांनी आणखी एक पत्र त्यांना पाठविले. त्यानंतर फडणवीस यांनी लवकरच माहिती पाठविणार असल्याचे पोलिसांना कळविले होते. परंतु पाच ते सहा वेळा पत्र पाठवूनही त्यांनी पोलिसांना उत्तर दिले नाही.