पुणे - 'दुचाकींचे शहर' अशी पुण्याची ओळख आहे. शहरामध्ये चार चाकी गाड्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढतचं आहे. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वायुप्रदूषण देखील अधिक होताना दिसते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सात ते आठ महिने पुणे शहरातही काटेकोरपणे लॉकडाऊन पाळण्यात आला. या काळात रस्त्यावर वाहनांची गर्दी नसल्याने किंबहूना एकही वाहन नसल्याने वायू प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून आले.
वर्षभर केली जाते वायू प्रदूषण चाचणी -
पुणे महानगरपालिकेतर्फे वर्षभर वायू प्रदूषणाची चाचणी केली जाते. त्यासाठी विविध पॅरामिटर(निकष) असतात. त्याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात. हा इंडेक्स वेगवेगळ्या प्रकारात मोडला जातो. चांगला, समाधानकारक, सर्वसाधारण, खराब, अति खराब आणि चिंताजनक असे सहा प्रकार यात असतात. पुणे शहरातील 2020च्या एअर क्वलिटी इंडेक्सचा विचार केला तर, पुण्यातील हवेची गुणवत्ता चांगला, समाधानकारक आणि सर्वसाधारण या तीन प्रकारात विभागलेली होती, असे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पाहणीत समोर आले.
पुणे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स मॉडरेट -
पुणे शहरासाठी चांगली बाब म्हणजे या काळात पुणे शहर कधीही खराब किंवा अति खराब वायू प्रदूषणाच्या पातळीला गेलेले नाही. तरीही शहराची वायू प्रदूषण पातळी ही सर्वसाधारणपासून समाधानकारक आणि चांगल्या पातळीवर कशी राहील यासाठी शहराचा प्रयत्न असणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. लॉकडाऊन काळात वायू प्रदूषणावर होणारे परिणाम मोजण्याची चांगली संधी पर्यावरण विभागाला मिळाली होती. या काळात केलेल्या नोंदींनुसार लॉकडाऊनच्या अगोदर हवेत दहा मायक्रोनपर्यंतच्या कणांचे हवेतील प्रमाण 80 मायक्रोग्रॅम प्रती क्युबीक मीटर होते. ज्या वेळेस लॉकडाऊन काळात रस्त्यावरील सर्व वाहने गायब झाली त्यावेळी केलेल्या नोंदीनुसार 10 मायक्रोनपर्यंतच्या कणांचे हवेतील प्रमाण हे साठ मायक्रोग्रॅम प्रती क्युबीक मीटर होते. याचा अर्थ शहराच्या रस्त्यावरील सर्व वाहने नाहीशी झाल्यानंतर पुणे शहराच्या वायु प्रदूषणाची पातळी ही, 'सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड'च्या स्टॅंडर्डपर्यंत येऊन थांबली आहे. ही चांगली बाब असल्याचे महापालिका अधिकारी सांगतात.