पुणे - लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी लागणारे निवडणूक साहित्य हे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कर्मचाऱ्यांना देण्यात आले. पोलीस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात ९१ तर बारामती लोकसभा मतदार संघात १२० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी वेब कास्टिंग, व्हिडिओ कॅमेरा यांची नजरा असणार आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तात मतदान केले जाणार आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
अशी आहे मतदारांची आणि संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या-
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ७४ हजार ८६१ मतदार आहेत. तर १९९७ मतदान केंद्र आहेत. यातील ९१ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. वेब कास्टिंग २२६ केंद्रावर करण्यात येणार आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघात २१ लाख १२ हजार ४०८ मतदार आहेत. यामध्ये २ हजार ३७२ मतदान केंद्राची संख्या आहे. तर २८५ वेब कास्टिंग केंद्र आहेत.