पुणे Pune Accident News : पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका महागड्या चारचाकीनं जवळपास तीन ते चार वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिलीय. या अपघातात वाहनचालकानं दारूच्या नशेत दोन ते तीन दुचाकी व एका रिक्षाला धडक देत पादचाऱ्यांनाही धडक दिली आहे. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झालाय तर तीन ते चार जण हे जखमी आहेत. उमेश हनुमंत वाघमारे, (वय 48) असं वाहन चालकाचं नाव आहे. तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) असं गाडीमालकाचं नाव आहे. या दोघांनाही विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर विश्वनाथ उपादे (वय ५६) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय.
दारूच्या नशेत कारचालकानं वाहनांना उडवलं : याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी उमेश हनुमंत वाघमारे आणि त्याचा मित्र नटराज हे दोघं दारू पिऊन गाडी चालवत होते. शहारतील डेक्कन येथील नदी पात्रापासून गाडी घेऊन जात असताना आरोपी उमेश वाघमारे याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि रस्त्यावर जाणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवलं. तसंच पुढं दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर प्रवासी घेऊन जात असलेल्या एका रिक्षाला त्यानं धडक दिली. यानंतर तो शेवटी एका लाईटच्या पोलला जाऊन धडकला. यात पायी चालत जाणाऱ्या विश्वनाथ उपादेंचा जागीच मृत्यू झालाय. तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
पुण्यातील त्या घटनेची आठवण : पुण्यात घडलेल्या या घटनेनं 2012 सालच्या एका प्रकरणाची आठवण करुन दिली. 25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत मनोरुग्ण असलेल्या या बसचालकानं भर रस्त्यात बस चालवत 9 जणांना चिरडलं होतं. तर त्यात 37 जण जखमी झाले होते.
हेही वाचा :