पुणे - 'पं. भीमसेन जोशी यांचे गायन अजरामर आहे. या संगीत यज्ञातून त्यांच्या स्मृती जपून त्यांना आपण अभिवादन केले, ही चांगली गोष्ट आहे. हा 'खयाल यज्ञ 'महोत्सव रसिकांच्या हृदयात कोरला जाईल. तसेच पं. भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सकाळी केले. ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाला नितीन गडकरी यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. भारतीय शास्त्रीय संगीतात फार मोठी शक्ती आहे. ते सर्वांना आवडते, पण त्याचे सादरीकरण, प्रेझेंटेशन आपण चांगल्या रितीने केले पाहिजे.संगीताच्या चांगल्या आराधनेला रसिकांचा प्रतिसाद मिळतो, पण, सरकार, पालिकांनी सभागृहे उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
"खयाल यज्ञाचा"
१३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या महोत्सवात अश्विनी भिडे-देशपांडे, पंडित डॉ. राम देशपांडे, पं जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे-साठे, संदीप रानडे, सौरभ नाईक, ओंकार दादरकर, पंडित रितेश आणि पंडित रजनीश मिश्रा, पद्मा तळवलकर या गायकांनी सादरीकरण केले. तर १४ फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर -टिकेकर, कलापिनी कोमकली, राहुल देशपांडे, निषाद बाक्रे, देवकी पंडित, विनय रामदासन, गौतम काळे, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, पंडित राजन मिश्रा, पंडित साजन मिश्र यांचे गायन होणार आहे. दरम्यान महोत्सवाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे भेट देणार आहेत. तर पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थितीत "खयाल यज्ञाचा" समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे.
हेही वाचा - 'तर गोव्याचे विमान राज्यपालांचेच असले असते, महाराष्ट्रातल्या प्रकारावर न बोललेलं बर'