पुणे - संपूर्ण राज्यभरात भक्तिभावाने गणरायाचे आगमन होत आहे. चित्रपट कलाकारांच्या घरातही गणरायांचे आगमन झाले आहे. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. परंतु अभिनेता प्रवीण तरडे यांनी स्थापन केलेल्या घरच्या गणपतीवरून मात्र वाद निर्माण झाला. संविधानाची प्रत गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने सोशल मीडियावर ट्रोल झालेले अभिनेते प्रवीण तरडे यांनी अनावधानाने झालेल्या त्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी व्हिडीओ शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे.
अभिनेते प्रवीण तरडे यांनी आज घरात गणपतीची स्थापना केली. पुस्तकापासून तयार केलेल्या डेकोरेशनमध्ये त्यांनी गणेशाची मूर्ती ठेवली होती. यात गणेशमूर्तीच्या खाली संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. तरडे यांनी हा फोटो काढून फेसबुकवर शेअर केला होता. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या दरम्यान, तरडे यांना ट्रोल करण्यात आले.
देशाचे संविधान पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला? असा जाब तरडे यांना सोशल मीडियातून विचारला जाऊ लागला. त्यानंतर तरडे यांनी तो फोटो डिलीट करून चूक दुरुस्त केली. तसेच त्यांनी व्हिडिओ शेअर करत तमाम जनतेची जाहीर माफीही मागितली.
हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया...मंगल मूर्ती मोरया...मानाच्या पहिल्या गणपती श्री कसबा गणपतीचे पालखीतून आगमन
हेही वाचा - पुण्यात ढोल-ताशांविना फक्त गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाच्या गणपतींचे आगमन