पुणे - लोकसभेसाठी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे, ते प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बारामतीत निवासस्थानी भेट घेतली. या भेटी बाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधून त्यांना अंतर्गत विरोध होवू लागल्याच्या पार्श्वभूमीवरही ही भेट झाली का? असे आराखडेही बांधले जात आहेत.
पवार आणि गायकवाड यांच्या भेटी वेळी अभिनेते अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे गायकवाड इच्छुक आहेत. आपले नाव शरद पवारांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवल्याचा दावा त्यांनी यापुर्वी केलेला आहे. त्या पार्श्वभुमीवर ही भेट झाली. मात्र, दुसरीकडे पुण्यातील जुन्या निष्ठावंत काँग्रेस नेत्यांकडून गायकवाड यांच्या नावाला विरोध केला जात आहे. कारण जुन्या नेत्यांपैकी अनेकजण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
शुक्रवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत जुन्या काँग्रेस नेत्यांनी प्रविण गायकवाड यांच्या नावाला विरोध केला होता. सध्या बारामतीत अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजीराजे हे महानाट्य सुरू आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी कोल्हे यांच्या समवेत गायकवाड आले होते, असे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या भेटीने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)